रत्नागिरी - आर्टिक्ट महासागरात आढळणाऱ्या वालरस या दुर्मिळ प्राण्याच्या दातांची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे अटक केली आहे. त्यांच्याकडून वालरसचे दात, वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली कार वन विभागाच्या पथकाने जप्त केली आहे. दुर्मिळ असलेले वालरसचे दात या तिघांना नेमके कोठून मिळाले. ते त्यांची विक्री कुठे करणार होते ? याचा शोध वन विभाग घेत आहे. तर वालरसच्या दातांची किंमती जागतिक बाजारपेठेत मोठी आहे.
वनविभागाला मिळाली होती गोपनीय माहिती
परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिघे वालरस या दुर्मिळ प्राण्याच्या दातांची तस्करी करणार असल्याचे समजले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मदतीने सापळा लावण्यात आला होता. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार पथकाने अडवून गाडीची झडती घेतली . यावेळी गाडीत वालरस या दुर्मिळ प्राण्याचे दात आढळून आले . त्यानंतर वन व पोलीसांच्या पथकाने मुहमंद नुमान यासिन नाईक, हेमंत सुरेश कांडर, राजन दयाळ पांगे या तिघांना अटक करण्यात आले आहे. तिघांविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये , गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर डॉ.व्ही. क्लेमेंट बेन यांच्या सहकार्याने ही कारवाई केली.
हेही वाचा - हितचिंतकांनीच मी भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा जनमाणसात उभी केली; एकनाथ खडसेंचा वाढदिवशी विरोधकांवर निशाणा