रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील ( Ratnagiri Rajapur Tahsil ) धोपेश्वर रिफायनरीबाबत लोकांची मतं जाणून घेण्यासाठी ग्रामसभा घेण्यात ( Dhopeshwar Refinery Gram Sabha ) आली. यामध्ये रिफायनरी विरोधात 466 मतं, रिफायनरी समर्थनार्थ 144 मतं, तर रिफायनरी संदर्भात तटस्थ 23 मतं पडली. धोपेश्वर गावच्या सरपंच स्नेहा उगले यांनी हा निकाल जाहीर ( Dhopeshwar Villagers Against Refinery ) केला.
५ हजार एकर जागा : रिफायनरी प्रकल्पावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं पत्र देखील समोर आलं. त्यामुळे शिवसेना या प्रकल्पासाठी सकारात्मक असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या प्रकल्पात जवळपास 5 हजार एकर जागा ही धोपेश्वर गावची असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे रिफायनरीबाबत धोपेश्वर गावच्या लोकांचं मत नेमकं काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. रिफायनरीचं धोपेश्वर रिफायनरी असं नवीन नामकरण झाल्यानं या गावच्या ग्रामसभेकडे लक्ष लागून राहिलं होतं.
ग्रामपंचायतीसाठी विषय संपला : धोपेश्वर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बारसू, धोपेश्वर, तिठवली, पन्हळे तर्फे राजापूर, बागकाझी हुसेन, बागअब्दुल कादिर या सहा महसूली गावातील लोकांनी रिफायनरीबाबत मतदान केलं. सकाळपासूनच यासाठी लोकांनी मोठी सभागृहात गर्दी केली होती. जे मतदान करतात अशांनाच यामध्ये मतदान करता आलं. धोपेश्वर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 2700 मतदार आहेत. पैकी 700 पेक्षा देखील लोकांनी रिफायनरी बाबतच्या ठराव प्रक्रियेत भाग घेतला. यामध्ये तीन प्रकारची मतं पाहायला मिळाली. विरोधाची मतं, समर्थनाची मतं आणि तटस्थ अशी मतं पाहायला मिळाली. यामध्ये रिफायनरी विरोधात 466 मतं, रिफायनरी समर्थनार्थ 144 मतं, तर रिफायनरी संदर्भात तटस्थ 23 मतं पडली. दरम्यान मतदान प्रक्रियेवरून रिफायनरी विरोधी मतं जास्त असून, धोपेश्वर ग्रामपंचायतीसाठी रिफायनरी हा विषय आता संपला आहे, हा विषय पुन्हा ग्रामसभेत घेतला जाणार नाही असं सरपंच स्नेहा उगले यांनी यावेळी स्पष्ट केलं.