रत्नागिरी - तिवरे धरणफुटीग्रस्तांचे पुनर्वसन अलोरे येथील पाटबंधारे विभागाच्या जागेत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अलोरे येथील पाटबंधारे विभागामार्फत कर्मचार्यांसाठी बांधलेली अनेक घरे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सुमारे 17 एकर जागेची मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे. जागा हस्तांतरण झाल्यानंतर तातडीने 56 कुटुंबियांसाठी वसाहत उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण दि.3 जुलैला फुटले रात्रीच्या सुमारास झालेल्या घटनेमुळे 23 जणांचे बळी गेले होते. तिवरे धरण फुटीला चार महिने उलटत आले आहेत. धरणामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबियांची तात्पुरती व्यवस्था तिवरे परिसरातच करण्यात आली असून, त्यांना कंटेनर घरे देण्यात आली आहेत.
धरणफुटीग्रस्तांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी अलोरे येथे पाटबंधारे विभागाने जागा देण्यास सहमती दर्शवली आहे. पाटबंधारे विभागाने ही जागा महसूलकडे वर्ग करण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, या जागेसाठी पाटबंधारेने जमिनीच्या मुल्याची मागणी केली आहे. ही जागा महसूलची असून, ती पाटबंधारेला देण्यात आली होती. त्यामुळे महसूल विभाग ही जागा ताब्यात घेऊ शकते व त्यावर पुनर्वसन करु शकते, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाशी यासंदर्भात पत्र व्यवहारही करण्यात आला असल्याने, लवकरच जागेचा निर्णय होईल. जागेवर 56 कुटुंबियांसाठी कशा पध्दतीने घरे बांधायची याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जागा ताब्यात आल्यावर तातडीने या ठिकाणी बांधकाम केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.