रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला बसला आहे. वादळामुळे घरांवर झाडे पडली, कौलारू घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मात्र, बाबासाहेबांच्या स्मारकाने अनेकांची जीव वाचवले. अनेक मंत्र्यांनी या गावाला भेट दिली. मात्र, अद्यापही बाबासाहेबांचे गाव मदतीपासून वंचित आहे.
गेल्या ३ जूनला कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले होते. त्याचा मोठा फटका मंडणगड तालुक्याला बसला. यामध्ये अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. याच मंडणगड तालुक्यात आंबडवे हे गाव आहे. हे बाबासाहेबांचे मूळ गाव असून या गावात बाबासाहेबांचे स्मारक देखील आहे. वादळ सुरू झाले त्यावेळी अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. कौलारू घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तसेच काही घरांची पडझड झाली. त्यामुळे ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन आश्रयासाठी बाबासाहेबांच्या स्मारकात गेले. सात ते आठ जणांनी या स्मारकाचा दरवाजा घट्ट धरून ठेवला. त्यामुळे स्मारकात सर्वजण सुरक्षित राहिले.
गरीबांना शासनाच्या मदतीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही -
आमदार योगेश कदम, परिवहनमंत्री अनिल परब यांनी या गावाला भेट दिली. मदतीचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप मदत पोहोचली नाही. घरची परिस्थिती चांगली असलेल्या लोकांनी आपआपली घरे सावरायला सुरुवात केली. मात्र, गरीबांना शासनाच्या मदतीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.