रत्नागिरी - शेळ्या चरवण्यासाठी जंगलात गेलेल्या सतरा वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. खेडशी चिंचवाडी येथे शुक्रवारी (दि.९ ऑगस्ट) रोजी सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास ही घटना घडली असून, मैथीली गवाणकर असे मृत तरूणीचे नाव आहे. ती खेडशी येथील महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत होती.
शुक्रवारी महाविद्यालयातून घरी आल्यानंतर मैथिली 4 च्या सुमारास शेळ्या घेऊन चिंचवाडी-सडा येथील जंगलात गेली होती. मात्र, सायंकाळी 6 वाजल्यानंतरही ती घरी परतली नाही. साडेसहाच्या सुमारास शेळ्या घरी आल्या. परंतू, मैथिली न आल्याने शोध घेण्यास सुरूवात झाली. मैथीलीचा शोध न लागल्याने वडील प्रवीण गवाणकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात धाव घेतली.
दरम्यान, काही स्थानिकांनी चिंचवाडी-सडा येथील परिसरात मैथीलीचा शोध सुरू केला. यावेळी एका झाडाखाली तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मैथीलीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाजवळ एक काठी, एक टोपी पोलीसांना आढळली आहे. तसेच पंचनामा करताना मृतदेहाजवळ मैथीलीचा मोबाईल पोलिसांना सापडला. पंचनामा झाल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला असून, हत्या झालेल्या ठिकाणावर शोधमोहीमेसाठी राखीव तुकडी तैनात करण्यात आली होती.
अशाप्रकारे क्रूरतेने मैथीलीची हत्या करण्यामागे काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.