रत्नागिरी - महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी घेतलेले विद्यापीठ आणि ही पदवी बोगस असल्याचा आरोप पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी केला आहे. तर सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले आहेत.
आता जो माझ्यावर आरोप झालाय, तोच आरोप विनोद तावडे मंत्री असतानाही झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीच माझी अन् विनोद तावडे यांची चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी प्रवीण दरेकर यांची एक सदस्यीय समिती नेमावी. जी काही चौकशी करायची आहे ती दरेकरांनी करावी, दरेकर साहेब पूर्ण पारदर्शक असल्यामुळे आमची चौकशी चांगल्या पद्धतीने करतील. आम्हाला न्याय देतील असा, टोला देखील उदय सामंत यांनी लगावला आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष
मी ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो, यात मला कमीपणा वाटत नाही, असे सष्ट मत सामंत यांनी व्यक्त केले आहे. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? आणि काय उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले आहेत, याची चौकशी करावी, अशी सूचना मी सरकारला करणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार - उदय सामंत
ज्यांना शिकून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. मात्र, जे डोनेशन भरू शकत नाहीत, अशा होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी डॉ. मनोहर आपटे यांनी हे विद्यापीठ सुरू केले आहे. मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे तिथे शिकलो. पण, तेव्हा मला माहित नव्हते, मी आमदार होईन, मंत्री होईन. आणि मी या विद्यापीठातून घेतलेली पदवी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. पण, या पदवीपासून आपण कोणतेही शासकीय लाभ घेतलेले नाहीत, असेही सामंत यांनी सांगितले.