रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील निसर्गरम्य अशा हेदवी समुद्रकिनारी असलेल्या बामणघळमध्ये पर्यटक पती-पत्नीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. सेल्फी काढताना दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सेल्फी पडली महागात
गुहागर तालुक्यातील हेदवी-बामणघळ हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. समुद्रकिनारी असणाऱ्या बामणघळावरील लाटेशी मौजमजा करत असताना ठाणे येथील पती-पत्नी सेल्फी काढत होते. याचवेळी आलेल्या समुद्राच्या लाटेबरोबर पत्नीचा तोल गेल्याने दोघोही बामणघळी पडले. पत्नी पडताना पाहून पतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याचाही तोल गेला. दोघांचाही बामणघळीत पडून मृत्यू झाला. अनंत माणगावकर (वय 36) सूचना माणगावकर (वय 33 रा. ठाणे) अशी पती-पत्नीची नावे आहेत.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती समजताच पोलीस पाटील, स्थानिक तरुण आणि गुहागरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या दोघांचे मृतदेह काढण्यात आले. नववर्षाच्या प्रारंभीच हेदवी समुद्र किनारी या पती-पत्नी पर्यटकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने फिरायला आलेल्या अनेक पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.