रत्नागिरी - खेड पंचायत समितीचा विस्तार अधिकारी तथा भरणे ग्रामपंचायतीच्या प्रशासकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले. भरणे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाचाही यामध्ये समावेश आहे. सोमवारी (२८ सप्टेंबर) रात्री ८ वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशननजीकच्या एका हॉटेल परिसरात हा प्रकार घडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय व्यावसायिकाने सामाजिक अंतर पाळले नसल्याने दवाखान्यास नोटीस बजावण्यात आली. मात्र कारवाईची नोटीस रद्द करण्यासाठी ही लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीनंतर अवघ्या महिन्याभरातच लाचखोर प्रशासक जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. देवानंद रामलाल मासरकर (५२, रा. भरणे) या लाचखोर प्रशासकासह सुनील सीताराम चिले (४०, रा. भरणे-घडशीवाडी) असे माजी सरपंचाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांचा भरणे येथे खासगी दवाखाना आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने वैद्यकीय व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी करून सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची तोंडी तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी दवाखान्यास नोटीस बजावण्यात आली. याबाबतचा खुलासा सादर न केल्यास कारवाई करण्याची तंबी लाचखोर प्रशासक मासरकर याने तक्रारदारास दिली होती. त्यानुसार कारवाई न करण्यासाठी लाचखोर प्रशासकाने तक्रारदाराकडे २० हजार रूपयांची लाच मागतली होती. त्यातील १० हजार रूपये स्वीकारले होते तर, उर्वरित १० हजार रूपये देण्यासाठी तगादा लावला होता. ही रक्कम न दिल्यास पुढील कारवाई अटळ असल्याचे तक्रारदारास सांगितले.
याप्रकाराची खासगी डॉक्टरने २८ तारखेला तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची शहानिशा करून सोमवारी सापळा रचला होता. १० हजार रूपयांच्या रकमेऐवजी तडजोडीनंतर ७ हजाराची मागणी केली. स्वत: साठी ५ हजार तर सुनील चिले याच्यासाठी २ हजार रूपये अशी ७ हजाराची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले.