रत्नागिरी - सोन्याचे दागिने पॉलीश करून देतो असे सांगून दोन तरूणांनी पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना चिपळूण शहरात घडली आहे. चिपळूण शहरातील एन्रॉन बायपास रोडवरील अम्मा व्हिला या इमारतीत गुरुवारी ही घटना घडली. हे चोरटे अगदी रुबाबदार कपडे घालून आले होते. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
ताबिश शेख यांनी माहिती दिल्यानुसार गुरुवारी (दि. 2 जून) सकाळी ते त्याची आई रहिमा शेख व वडील, असे तिघे घरी होते. ताबिश वरच्या माळ्यावर आपल्या ऑनलाइन कामाची आवराआवर करत होते. दरम्यान, खाली दोन तरूण अगदी चांगले कपडे घालून चकाचक आले होते. आम्ही दागिने पॉलीश करून देतो, असे सांगत सुरुवातीला दोन तीन दागिने पॉलिश करून दिले व विश्वास संपादन केला. काही वेळाने त्यांनी रहिमा शेख यांची सोन्याची चेन व हातातील एक बांगडी पॉलिश केली व दहा मिनिटे त्याला हात लावू नका असे सांगितले. 4.8 तोळ्याचे खरे दागिने घेऊन त्यांनी तेथून पोबारा केला. थोड्या वेळाने काहीच कसे झाले नाही म्हणून दागिने पाहिले असता. ते दागिने खोटे असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी ताबिशला हाक मारली व त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्या तरुणांचा शोध न लागल्याने मग त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ताबिश शेख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा - Nilesh Rane : अनिल परब हा मातोश्रीचा एजंट; निलेश राणेंची टीका