रत्नागिरी - भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. निवळी-गणपतीपुळे मार्गावरील मासेबाव येथे बुधवारी दुपारी हा अपघात झाला. सुर्यकांत जाधव आणि रविंद्र बाबल्या धनावडे अशी मृतांची नावे आहेत.
सुर्यकांत जाधव (रा.चाफवली संगमेश्वर, सध्या राहणार कारवांचीवाडी) व रविंद्र बाबल्या धनावडे (रा. कारवांचीवाडी) हे दोघे कुरबुडेहून निवळीकडे दुचाकीवरुन येत होते. याचवेळी निवळीहून जयगडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (एमएच ४५ -९५९६) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला जावून उलटला.
ट्रकची धडक जोरदार असल्याने दुचाकीवरुन दोघेही रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर त्यातील एकाचा पाय अर्ध्यावर तुटला होता. अपघातानंतर तत्काळ दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यापुर्वी संदीप गोरे यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात अपघाताची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा केला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन बुधवारी सायंकाळी करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ट्रक चालकाविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूर्यकांत जाधव हे एसटी वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. या दोघांच्या मृत्यूमुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.