रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर मेन्टेंन्स व्हॅनला झालेल्या अपघातामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. खवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ वावे गावाच्या परिसरात हा अपघात झाला. मेन्टेंन्स व्हॅनची मागील दोन चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प आहे. रुळावरून गाडी घसरल्याने रुळाला तडे गेले आहेत. हे मशीन बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला.
मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे युद्धपातळीवर प्रयत्न
आज सकाळी मेन्टेंन्स व्हॅन खवटी खेडवरून रत्नागिरीकडे जात असताना ही घटना घडली. सध्या मेन्टेंन्स व्हॅन बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. दरम्यान रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, वेल्डफेल्युअरमुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
अपघातामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प
या अपघातामुळे गाड्या ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत. वाहतूक खोळंबल्याने प्रवासी स्थानकात अडकून पडले आहेत. तेजस एक्सप्रेस महाड जवळील वीर स्थानकात थांबवण्यात आली आहे. जबलपूर- कोईमतूर रेल्वे करंजाडी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली आहे. तर हजरत निझामुद्दीन- एर्नाकुलम रेल्वे कोलाड रेल्वे स्थानकात आणि मडगाव मांडवी एक्सप्रेस ही रोहा स्थानकात थांबवण्यात आली आहे.