रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. अशात गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 64.60 टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र 60.96 टक्के मतदान झाले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात 60 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले होते. यावेळी मात्र दापोली आणि चिपळूण मतदारसंघ वगळता इतर तीन मतदारसंघात 60 टक्के पेक्षा कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यात यावेळी एकूण 10 लाख 13 हजार 555 मतदार होते. पैकी 7 लाख 98 हजार 879 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदान दापोली आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात झाले आहे. या दोन मतदारसंघात 65 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले आहे. दापोलीत 65.93 तर चिपळूणमध्ये 65. 54 टक्के मतदान झाले. गुहागर विधानसभा मतदारसंघात 59.28 टक्के, रत्नागिरी 57.65 तर राजापूरमध्ये 55.50 टक्के मतदान झाले आहे.