रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. तर राजापूर शहराच्या जवाहर चौकापर्यंत 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आलं आहे. रत्नागिरीतल्या चांदेराई परिसरातही पाणी भरलं आहे.
मुसळधार पावसामुळे तीन दिवसांपूर्वी चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यावेळी करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा अशीच स्थिती उद्भवते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वाढल्याने चिपळूण शहरातील जुना बाजार पूल पाण्याखाली गेला आहे. सखल भागातही पाणी भरलं आहे. नाईक कंपनी परिसरात पाणी भरलं आहे. जर पावसाचा जोर वाढला तर पूरस्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. बाजारपेठेत सध्या 4 फूट पाणी आहे. त्यामुळे चांदेराई लांजा रस्त्यावर पाणीच पाणी आहे. पाणी रस्त्यावर आल्यानं चांदेराई-लांजा आणि चांदेराई -रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली आहे.