रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या सप्तलिंग नदीतील पाण्यात मुलगा, वडील आणि पुतण्याचा मृत्यू झाला तर, एकजण बुडण्यापासून वाचला आहे.
जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मृतांची नावे आहेत. तर, प्रसाद पांचाळ हा बुडण्यापासून वाचला आहे. मुंबई येथे राहणारे जनार्दन पांचाळ सुट्टीनिमित्त आंबवली येथे आले होते. ते मुंबईत शिक्षक होते. आज (सोमवार) ते आपल्या कुटुंबासह सप्तलिंग नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही डोहात बुडू लागले. काठावर असलेल्या इतर कुटुंबियांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि लाकडाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, फक्त प्रसाद काठीच्या सहाय्याने काठावर आला. अन्य तिघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती समजताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर येथील रुग्णालयात पाठवले आहेत.