रत्नागिरी - रत्नागिरीत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा राजवाड्याचे अंतरंग आता पर्यटकांना पाहता येणार आहे. नूतनीकरणाच्या कामामुळे वाड्याच्या मुख्य भागासह थिबा राजाच्या आतील खोल्या, स्वयंपाकघर, दरबार हॉल, असे अनेक भाग पर्यटकांना पाहता येत नव्हते. पण आता राजवाड्याचे हे सर्व अंतरंग पर्यटकांना पाहता येणार आहेत.
रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती आणि निसर्गरम्य परिसरात ऐतिहासिक थिबा राजवाडा आहे. पाच एकराच्या विस्तीर्ण परिसरात वसलेला हा राजवाडा ब्रम्हदेशाच्या (आत्ताचं म्यानमार) थिबा नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता.
इतिहासाची साक्ष देणारा हा वास्तूरुपी ठेवा पर्यटकांना काही वर्ष दुरुस्तीचं काम सुरू असल्याने पूर्ण पाहता येत नव्हता. अनेक पर्यटक बाहेरून राजवाडा पाहून आणि संग्रहालय पाहून परतत होते. प्रवेशही मागच्या बाजूने असायचा. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होत होता.
आता रत्नागिरीतील पुरातत्व विभागात सहाय्यक संचालक पदावर नव्याने रुजू झालेल्या विलास वाहणे यांनी हा पूर्ण वाडा पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता पर्यटकांना वाड्याचे अंतरंग पाहता येणार आहेत.
थिबा हा ब्राम्हदेशचा शेवटचा राजा. मात्र त्याची पत्नी सुपायलतीच्या कुटील कारवायांमुळे ब्रिटिशांनी ब्रम्हदेशवर आक्रमण करून ८ नोव्हेंबर १८८५ रोजी थिबाला अटक केली. त्यानंतर थिबा आणि त्याच्या कुटुंबाला सुरुवातीला मद्रास आणि त्यानंतर रत्नागिरीत आणण्यात आले.
थिबा राजासाठी ब्रिटिशांनी हा राजवाडा बांधला. नजरकैदेत असूनही त्याच्या आवडीनिवडीचा आदर ब्रिटिशांनी राखला होता. निसर्गरम्य परिसरात जिथून समुद्राचे दर्शन होईल अशा टेकडीवर त्या काळी सव्वालाख रुपये खर्च करून हा राजवाडा बांधण्यात आला. या राजवाड्याच्या बांधकामावर ब्रिटीश व ब्राह्मी या दोन्ही स्थापत्य शैलीचा प्रभाव जाणवतो. १९०६ मध्ये या राजवाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर १३ नोव्हेंबर १९१० रोजी थिबाला त्याच्या कुटुंबासह रहावयास आणण्यात आले. शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच १६ डिसेंबर १९१६ पर्यंत या तो राजवाड्यात नजकैदेत राहिला. या राजवाड्यात थिबाचे कपडे, थिबाने वापरलेल्या काही वस्तू आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
दरबार हॉलसहित जवळपास १८ दालने या राजवाड्यात आहेत. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्टया लावलेल्या असून अर्धवर्तुळाकार खिडक्यांना रंगबिरंगी इटालियन काचा लावलेल्या आहेत. पण गेली काही वर्षे पर्यटकांना मात्र संग्रहालय वगळता मुख्य राजवाडाच पाहता येत नव्हता, पण सहाय्यक संचालकांच्या या निर्णयामुळे पर्यटकांना पूर्ण पाहता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.