रत्नागिरी - यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. मात्र, असे असूनही गणेशोत्सवाबाबतचा भाविकांचा उत्साह काही कमी झालेला नाही. नाणीज गावातील भाविकांनी चतुर्थीच्या आदल्या दिवशी लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची प्रथा आजही पाळत मोठ्या भक्तीभावात गणरायाला घरी आणले.
कोकणातला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. उद्या(शनिवार) गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे हा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. कोकणातल्या अनेक ग्रामीण भागात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरात आपले लाडके बाप्पा आण्याची प्रथा कोकणात आजही पाहायला मिळते. डोक्यावर गणेश मूर्ती ठेवून बाप्पाला घरी आणण्यात येते. निसर्गरम्य वातावरणातून गणपती घरी आणले जातात. यावर्षीही ही परंपरा अनेकांनी जपल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाचे सावट असल्याने सर्व नियमांचे पालन करून भाविक गणेश मूर्ती आपल्या घरी घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र, ढोल ताशांच्या गजराशिवाय आज अनेक ठिकाणी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक खेडे गावात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने गणरायाला डोक्यावरून आणले जाते. ज्या ठिकाणी गणेशमूर्ती घडतात तेथूनच पाटावर विराजमान झालेल्या गणरायांना डोक्यावर ठेवन घरी नेण्यात आले. अत्यंत साधेपणाने आज अनेक घरात गणरायाची मूर्ती नेण्यात आली.