रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता आणखी 3 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 364 एवढी झाली आहे. जिल्ह्यात गेला महिनाभर सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
रविवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून 46 अहवाल हे निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 364 एवढी झाली आहे. दरम्यान या तीन अहवालांमधील एकाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. 3 जुन रोजी कामथे येथे मृत झालेल्या रुग्णाचा अहवाल आज प्राप्त झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 14 झाली आहे.
आज प्राप्त झालेले इतर दोन पॉझिटिव्ह अहवाल हे अनुक्रमे रत्नागिरी 1 आणि संगमेश्वर 1 असे आहे. तसेच आज 6 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान आतापर्यंत एकूण 173 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण 177 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. मात्र, सातत्याने जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या चिंतेची बाब आहे.