रत्नागिरी - शहरानजिकच्या कसोप येथील सर्वंकष विद्यामंदिर (एसव्हीएम) येथे शनिवारी 'वी आर द वर्ल्ड' या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपकमाद्वारे विद्यार्थ्यांनी पोर्तुगाल, अफगाणिस्तान, चीन, स्पेन, ऑस्ट्रेलिया, इराण, टर्की, यमेन, केनिया या देशांचे सादरीकरण करून उपस्थितांना जगाची सफर घडवली. रत्नागिरीत सर्वप्रथमच याप्रकारचा कार्यक्रम पार पडल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
हेही वाचा - इंटरनेट एक युद्धक्षेत्र...
लोकल ते ग्लोबल या धर्तीवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशांची माहिती मिळावी तसेच त्याविषयी ज्ञान मिळावे व प्रत्यक्ष अनुभव हा या मागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. शनिवारी सकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. प्रवेशद्वारावर पासपोर्ट देऊन उपस्थितांना प्रवेश देण्यात आला. शाळेतील पूर्वप्राथमिक गटातील 3 वर्ग रत्नागिरी, महाराष्ट्र व भारत यांचे सादरीकरण केले. यात रत्नागिरीतील फीशिंग, महाराष्ट्रातील पालखी, वारकरी संप्रदाय व लेझीम तसेच विविध सण यांचे सादरीकरण तसेच भारतातील विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य सादर करण्यात आले. या बरोबरच वेशभूषा, खानपान, कला, साहित्य, क्रीडा, भाषा यांचेही सादरीकरण करण्यात आले. इयत्ता पहिली पासून सातवीपर्यंतचे विद्यार्थ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशांचे सादरीकरण केले. यात सर्वप्रथम इयत्ता पहिलीने पोर्तुगाल देश साकारला.
प्रसिदध कृत्रिम अॅक्वरियमची प्रतिकृती साकारण्यात आली होती. उपस्थितांनी पोर्तुगीजच्या पेस्ट्रीजचा आस्वादही घेतला. तसेच या देशातील पारंपरिक खेळात भाग घेऊन विजेता होणाऱ्यांना एक खास बक्षीस 'रेड रूस्टर' देण्यात आले. यानंतर इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी अफगाणिस्तानचे विविध देखावे व प्रतिकृतीतून नृत्य सादरीकरण केले. तिसरीतील विद्यार्थ्यांनी चीन या देशाचे सादरीकरण केले. यात चीनची भिंत, राष्ट्रीय प्राणी पांडा, तेथील भाषा व ड्रॅगनच्या प्रतिकृतींनी उपस्थितांची वाहवा मिळवली. चायनीज फूड व 'फॅन डान्स'चे कौतुक करण्यात आले. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी स्पेन देश साकारला यात स्पेनमधील प्रसिद्ध व्यक्तिरेखा विद्यार्थ्यांनी साकारल्या यात पिकासो, फलेमिंको डान्सर, बुल फायटर व स्पेन क्वीन इत्यादी तसेच वर्गातील विद्यार्थी व उपस्थितांमध्ये एक फुटबॉल मॅचचे आयोजनही करण्यात आले.
कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. कोवळे तसेच सर्वकष शिक्षण ट्रस्टचे ट्रस्टी दीपक गद्रे यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पालक, रत्नागिरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी लावले प्राध्यपकांचे मासिक वेतन सांगणारे फलक