रत्नागिरी - सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराच्या गलथान कामाचा फटका लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. मातीचा भर शेतात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी ठेकेदारांकडून ठिक-ठिकाणी भर टाकण्यात आला आहे. मात्र उन्हाळ्यातच याची योग्य काळजी न घेतल्याने ठेकेदाराच्या ढिसाळ कामाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याचा प्रत्यय लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना आला. वाकेड मराठी शाळेजवळ महामार्गासाठी टाकलेला मातीचा भर वाहून थेट शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी रात्री पडलेल्या पावसाने हा भर थेट शेतात जाऊन शेतीच्या 30 मळ्या, माती आणि दगडाने भरून गेल्या आहेत. त्यामुळे जयवंत भीतळे, शशिकांत भीतळे यांच्यासह जवळपास सहा ते सात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात वाहून आलेल्या या भरावामुळे पेरणीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या नुकसानीची माहिती देऊनही प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.