रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील अर्जुना धरणाचा उजव्या कालव्याचे बांधकाम काही ठिकाणी पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यापूर्वीच या कालव्याचे काम करण्यात आले होते. पावसाचा जोर आणखी वाढल्यास कालवा फुटून आजूबाजूच्या वस्तीला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कालव्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे.
1 किलोमीटर लांबीचा उजवा कालवा गेला वाहून
जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान राजापूर तालुक्यातील पाचल कोंडवाडी येथे अर्जुना कालव्याचे बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. मुसळधार अतिवृष्टीमध्ये पाचल कोंडवाडी येथील अर्जुना धरणाचा 1 किलोमीटर लांबीचा उजवा कालवा वाहून गेला आहे. कालव्यातील सिमेंट अस्तरीकरण वाहून गेले आहे . पावसाचा जोर आणखी वाढल्यास कालवा फुटून आजूबाजूच्या वस्तीला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या कालव्याचे काम करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात हा कालवा वाहून गेल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले असून या कालव्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कामावरच प्रश्नचिन्ह?
तळवडे ब्राहाणदेव येथील कालव्याची संरक्षक भिंत कोसळली असून, येथील शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले. पहिल्याच पावसात या कालव्याची दुरवस्था व दुर्दशा झाल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यावर शासनाचे करोडो रुपये खर्च झालेले आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकरी आजही पाण्यापासून वंचित आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचा एकाही शेतकऱ्याला उपयोग झालेला नाही. त्यामुळे नेमका हा प्रकल्प कोणासाठी शेतकऱ्यांसाठी की ठेकेदार, अधिकारी यांना पोसण्यासाठी, असा प्रश्नही सौंदळकर यांनी उपस्थित केला आहे.