रत्नागिरी - दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात रविवारी रात्री अचानक आलेल्या वादळामुळे एका नौकेला जलसमाधी मिळाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री अचानक आलेल्या दक्षिणेकडील वादळामुळे महेश लक्ष्मण रघुवीर यांच्या परमेश्वरी या नौकेला पूर्णपणे जलसमाधी मिळाली. रविवारी सायंकाळी फिशिंगला जाण्यासाठी लागणारे सामान भरून आज नौका मासेमारीला जाणार होती, पण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रचंड जोराचे वादळ झाले. दक्षिणेकडील जोरदार वाऱ्यामुळे किनाऱ्यावर असणाऱ्या नौका एकमेकांवर आदळून परमेश्वरी ही नौका फुटली आणि पूर्णपणे पाण्यात बसली. या नौकेमध्ये असणाऱ्या सहा खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, नौका पूर्णपणे बुडून अंदाजे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. या नौकेबरोबर इतर छोट्या बोटींचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. निव्वळ जेटी नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे, त्यामुळे इथे जेटीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.