रत्नागिरी - शहर व ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करा, अशा सूचना पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बुधवारी चिपळूण येथे दिल्या. पंचायत समिती सभागृह, चिपळूण येथे जिल्ह्यातील चिपळूण व खेड तालुक्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
तत्काळ आराखडा तयार करुन प्रस्ताव पाठवा -
पूरपरिस्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या तालुक्यांचा अन्य गावांशी तुटलेला संपर्क पूर्ववत करण्यासाठी आवश्यक बाबींचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. महत्वाच्या विषयांची प्राथमिकता ठरवून आराखडा तयार करणे आवश्यक आहे. असे पालकमंत्री ॲड. परब यांनी सांगितले. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी विभागाने पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत -
पुरामुळे मोठ्या प्रमाणात कचरा झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. पूर ओसरल्यावर साथीचे रोग पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. ही रोगराई टाळण्यासाठी औषधांचा साठा, वैद्यकीय पथक यांचे योग्य नियोजन आरोग्य विभागाने करावे. पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर करुन जे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्याबाबतची पुढील कार्यवाही तातडीने करावी, तसेच उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी बैठकीत दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी विभागाचा आढावा घेतला. कृषी विभागाने पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, अशा सूचनाही त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
जास्तीत जास्त बाधितांना मदत करण्यात यावी -
पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांकरीता येणारी मदत संबंधित बाधित व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन व नियंत्रण प्रशासनाने चोखपणे करावे. शासकीय निकषांचा योग्य प्रकारे वापर करुन जास्तीत जास्त बाधितांना मदत करण्यात यावी. मोबाईल संपर्क यंत्रणा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत. पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करताना तांत्रिक बाबींमुळे अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा - चिपळूणच्या स्वच्छतेसाठी 2 कोटींचा निधी, मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा