रत्नागिरी - दापोलीतील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेमध्ये गेले काही दिवस नाराज असलेल्या दळवी यांनी रत्नागिरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी रात्री उशिरा भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लवकरच तुम्हाला बोलावतो आणि चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे दळवींनी सांगितले.
हेही वाचा - जीव गेला तरी नाणार रिफायनरी होऊ देणार नाही; ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
दापोली मतदारसंघातून 5 वेळा शिवसेनेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार दळवी आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या वादाचा फटका शिवसेनेला दापोलीत बसणार हे आता स्पष्ट झाले आहे. दळवी लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे स्वतः दळवी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुखांकडेही मी न्याय मागितला आहे. मात्र, पक्षाने आपली दखलच घेतली नाही, तर मात्र मला निर्णय घेणे भाग पडेल. निर्णय घ्यायची वेळ आलीच, तर भाजपमध्ये जाईन, असेही दळवी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - गणपतीपुळे येथील समुद्रात सांगलीचे ३ जण बुडाले, एकाचा मृत्यू
तर रामदास कदमांनी माझ्या मतदारसंघात घुसखोरी करून मलाच बदनाम करण्याचे षडयंत्र आखले आहे. रामदास कदम दबावतंत्र, नेतेपद आणि मंत्रिपद याचा गैरफायदा घेऊन पक्षाला ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही दळवी यांनी केला आहे.