रत्नागिरी - विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने जीवदान दिलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव इथं ४५ फुट खोल विहिरीत बिबट्या पडला होता. अमोल जाधव यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला होता. तब्बल साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने या बिबट्याला सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे.
साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात यश
भक्षाचा पाठलाग करताना रात्री एक बिबट्या जालगाव मिसाळवाडी येथील अमोल जाधव यांच्या ३५ ते ४० फूट विहिरीत पडला होता. आज सकाळी ५.३० वाजणेचे सुमारास अमोल जाधव पाण्याची मोटर सुरु करत असताना, ती सुरु झाली नाही म्हणून ते विहिरीजवळ गेले असता त्यांना एक बिबट्या त्यांच्या विहिरीत पडलेला आढळून आला. यानंतर ही माहिती वनविभागाचे अधिकारी वैभव बोराटे यांना कळविण्यात आल्यावर ते आपल्या सहकार्यांसह या विहिरीजवळ पोचले. तोपर्यंत विहिरीत पडलेला बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं होतं.
बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं
उपनिरीक्षक निनाद कांबळे, हेड कॉन्स्टेबल संदीप गुजर व त्यांचे सहकारी यांनी मिसाळवाडी गाठून गर्दीला पांगविले. बिबट्याला विहीरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकार्यांनी प्रथम एक छोटा पिंजरा विहिरीत सोडला, पण बिबट्या त्याच्यात येत नसल्याने मोठा पिंजरा आणून तो विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतर अखेर काही वेळाने बिबट्या या पिंजर्यात शिरला. दुपारी १२ वाजता या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं. हा बिबट्या नर जातीचा असून तो सुमारे ४ वर्षांचा आहे. त्याचे वजन ६० ते ७० किलो असून त्याची शेपटीपासून लांबी १.९६ मीटर असून उंची ८६ से.मी. आहे. त्यानंतर या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.
या बिबट्याला विहीरीबाहेर सुखरूप काढण्यासाठी परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे, दापोलीचे वनपाल सात्तापा सावंत, मंडणगडचे वनपाल दौलत भोसले, वनरक्षक महादेव पाटील, सुरेखा जगदाळे, सूरज जगताप, परमेश्वर डोईफोडे, संजय दुंडगे, बालाजी नांदुरके, नगरसेवक सचिन जाधव, प्राणिमात्र किरण करमरकर, प्रितम साटविलकर, सुरेश खानविलकर, पोलिस पाटील देवेंद्र शिंदे यांचेसह ग्रामस्थांनी मदत्त केली..
हेही वाचा - 14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको