रत्नागिरी - सैराट म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे परश्या अन् आर्ची. यात आर्ची आली रे...ही हाक ऐकून परश्याने होडीवरून पाण्यात मारलेली उडी चांगलीच फेमस झाली होती. अशीच एक उडी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही उडी घेतली राजापूर तालुक्यातील एका व्यक्तीने. ट्रकवरून पुराच्या पाण्यात उडी मारतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अनेकदा स्टंट करताना दुर्घटना घडूनही स्टंट करणाऱ्यांच्या हौस काही कमी होत नाहीत. असाच राजापूरमधील एक तरुण दोन दिवसांपूर्वी स्टंटबाजी करताना मोबाईलमध्ये कैद झाला आहे. नदीच्या काठावर उभ्या असलेल्या टेम्पोवरून पुराच्या पाण्यात उडी मारत असलेला हा व्हिडिओ आहे. दोन दिवसांपूर्वी राजापूरच्या कोदवली नदीला पूर आला होता. यामुळे जवाहर चौकापर्यंत पाणी भरलं होत. यावेळी नदीच्या काठावर काही वाहने उभी करून ठेवण्यात आली होती. यात एक टेम्पो देखील होता. या टेम्पोवरून एका तरुणाने थेट नदीत उडी घेतली. विशेष म्हणजे याचा व्हिडिओ बनवण्यात आला. आणि या व्हिडिओला सैराट झालं जी गाण्याची धून वापरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. सध्या हा व्हिडिओ जिल्हयात व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.