रत्नागिरी- लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील अनेक कामगार आणि विद्यार्थी जिल्ह्यात अकडून पडले आहेत. हातात काम आणि अन्न-पाण्याची सोय नसल्याने ते हवालदील झाले आहेत. मात्र, आता धीर सुटल्याने कामागार आणि विद्यार्थ्यांनी आज शहरातील साळवी स्टॉप येथून मोर्चा काढला व थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेला. मात्र, पोलिसांनी हा मार्चा रस्त्यातच अडवला. पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढल्यानंतर हा मोर्चा निवळला.
सध्या तमिळनाडूमधील जवळपास ४५० कामगार आणि विद्यार्थी रत्नागिरी शहरात अडकले आहेत. हे सर्वजण एका अॅग्रिकल्चर कंपनीत सेल्समन पदावर कार्यरत आहेत. तर याच कंपनीत त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे काम नसल्याने कामगार व विद्यार्थ्यांच्या हातात पैसा नाही. गेल्या दीड महिन्यापासून हे कामगार व विद्यार्थी एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असून अपुऱ्या सुविधा व अन्नपाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांचे हाल होत आहे. याला कंटाळून आम्हाला आमच्या गावी सोडा या मागणीसाठी परराज्यातील विद्यार्थी व कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांसमोर विद्यार्थी व कामगार आपल्या समस्यांचा पाढा वाचणार होते.
त्यानुसार, शहरातील साळवी स्टॉप येथून मार्चाला सुरवात झाली. मात्र, मोर्चा निघताच पोलीस दल अलर्ट झाले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना शिवाजीनगर येथे पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी परराज्यातील विद्यार्थ्यांनी आम्हाला आमच्या गावी सोडा अशी मागणी पोलिसांकडे केली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढली, तसेच यावर काहीतरी तोडगा काढू असे आश्वासित केले. दरम्यान या विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या राज्याकडून परवानगी मिळाली की या सर्वांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- लॉकडाऊन ३.० : दापोलीत क्वारंटाईन कक्षाबाहेर झोपणाऱ्यावर गुन्हा दाखल