रत्नागिरी - कबड्डीचा फिवर सध्या ग्रामीण भागात चांगलाच दिसून येत आहे. कोकणात कबड्डी खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. कबड्डी खेळतानाचा एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी जिल्हापरिषद शाळेत पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या आयुष्य रवींद्र मुळ्ये याचा हा व्हिडिओ असून त्याची कबड्डी खेळातील पकड भल्या भल्यांना तोंडात बोटे घालायला लावते. आयुषची खेळातील आक्रमकता आणि त्याची चपळाईता पाहून सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा - 'सायक्लोथॉन' रॅलीला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला आयुष्य रवींद्र मुळ्ये याचे आई-वडील मजूरी करतात. त्यामुळे तो शिक्षणासाठी पांगरी गावातून रत्नागिरीत मावशीकडे आला. तो सध्या कारवांचीवाडी शाळेत शिकत आहे. नुकत्याच झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेतील कबड्डी सामन्यात त्याने चित्याच्या चपळाईने झेप घेत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला बाद केले. आयुषची खेळातील आक्रमकता पाहून सर्वांनीच त्याचे कौतुक केले. पाचवीत शिकणाऱ्या आयुषला योग्य प्रशिक्षण आणि सहकार्य मिळाल्यास कबड्डीच्या विश्वात तो रत्नागिरीचे नाव उज्वल करू शकतो.
हेही वाचा - शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज गावडेची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड