रत्नागिरी- काही लोकांना चांगल्या निर्णयांवर देखील टीका करण्याची सवय झालेली आहे, असा टोला शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लगावला आहे.
मेट्रोचे कारशेड आता आरे ऐवजी कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. त्यानंतर दरेकर यांनी या निर्णयाबाबत सरकारवर टीका केली होती. यावरून सामंत यांनी दरेकर यांना टोला लगावला आहे. मेट्रो प्रकल्पासाठी सरकारने ही जागा मोफत देऊ केली आहे. मात्र, आरे परिसरात कारशेडसाठी झालेले बांधकाम आणि खर्च वाया जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा विनियोग राज्य सरकार योग्य प्रकारे करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले होते. यावर, अदलाबदलीतच या सरकारचे दिवस गेले आहेत. एकदा काय ती जागा निश्चित करण्याची आवश्यकता आहे. आरेमध्ये पहिली जी जागा घेण्यात आली, त्यावर खर्च झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार. आणि आताची जागाही बदलली जाणार नाही हे कशावरून, असा प्रश्न विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला केला होता.
यावर मंत्री उदय सामंत यांना विचारले असता, आरे कारशेडबाबत जनतेला जो निर्णय हवा होता तसा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, चांगल्या निर्णयांवर देखील टीका करण्याची सवय काही लोकांना झालेली आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकारांची टीका ही त्याचाच एक भाग असल्याचा टोला सामंत यांनी लगावला आहे.
हेही वाचा- रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भात शेतीला फटका