रत्नागिरी - अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे समुद्रकिनारी व खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी आणि मच्छिमारांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
लक्षद्वीप बेटाच्या वायव्येला २०० किमी दूर या वादळाचे केंद्र असून ते मुंबईपासून साधारणत: ८४० किमी दूर नैऋत्य दिशेने व गुजरात राज्याच्या आग्नेय दिशेने वेरावल (गुजरात) पासून १०२० किमी दुरुन जाणार आहे. त्याची तीव्रता पुढील १२ तासानंतर वाढणार आहे. वायव्य दिशेला ७२ तासानंतर वळणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. हे वादळ प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर अंतरावरुन जाणार असले, तरी या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार आहे. वादळी वाऱ्यासह उंच लाटा उसळण्याची व मुसळधार पावसाची शक्यता असल्याने १० जून ते १३ जून २०१९ या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, तसेच समुद्रकिनारी व खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी आणि मच्छिमारांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.