रत्नागिरी - राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं काही नवी नाहीत. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण गुहागरमध्ये त्यांनी बेधडकच नाही तर धक्कादायक विधान केलं आहे. दारू विकणाऱ्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची शिवसेनेचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पाठराखण केली आहे. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? असं म्हणत त्यांनी हे धक्कादायक विधान केले. ते गुहागर येथे बोलत होते. सध्या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पोलीस देखील हफ्ते घेत नाहीत का?
लॉकडाऊनमध्ये दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी पोलिसांचा समाचार घेतला. पोलीस देखील हफ्ते घेत नाहीत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 8 नोव्हेंबरचा हा व्हिडीओ आहे.
दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका -
भास्कर जाधवांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मुलींची छेडछाड आणि चोरी या फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वास्त केलं.
एका माजी मंत्री, विद्यमान आमदारानं केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. जबाबदार लोकप्रतिनिधींना हे विधान शोभतं का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
हेही वाचा- 'जैश'च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई
हेही वाचा- चारित्र्यहिन सदाभाऊंचे हातही अस्वच्छच; तडजोडीच्या मुद्यावरून राजू शेट्टींचे टीकास्त्र