रत्नागिरी - ज्या पक्षाची तुम्ही तळी उचलायला सुरुवात केलेली आहे, त्या भाजपची सत्ता जवळपास संपूर्ण देशात आहे. त्यामुळे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन सांगा संपूर्ण देशातले भोंगे उतरवा, असं म्हणत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
मनसेने तळी उचलण्याची धंदा सुरू केला - भोंगे केवळ मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नाहीत. अख्ख्या देशामध्ये आहेत. जर कायदा करायचा झालाच तर संपूर्ण देशात होऊ दे, पण पंतप्रधानांना सांगायचं नाही आणि राज्य सरकारला डिवचायचं, अडचणीत आणायचं अशा पध्दतीच राज ठाकरे यांचं जे सुरू आहे ते योग्य नाही. हवेप्रमाणे सूर बदलायचे, सिझनप्रमाणे रंग बदलायचे हे मनसेचं एक खाद्य आहे. स्वतःच्या पक्षाला सोईस्कर ठरेल अशा पध्दतीची कोणाची कोणाची तळी उचलायची हा धंदा मनसेने आजपर्यंत केलेला आहे. आता भाजपची सुपारी घेऊन राज ठाकरे मैदानात उतरले आहेत.
आरएसएसला आता कसं काय सूचलं - आरएसएसने जागेबाबत दिलेल्या पत्राबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, एवढ्या वर्षानंतर त्यांना हे कसं काय सुचलं की ती आमची जागा आहे. महापालिका याची शहानिशा करेल, असं राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान किरीट सोमय्या यांच्या बाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, स्वतःचं झाकून ठेवायचं आणि इतरांचं वाकून बघायचं हे भाजपने आजपर्यंत केलं. एकीकडे देशभक्तीचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे देशाला लुबाडणाऱ्या सोमय्यांची पाठराखण करायची आशा शब्दांत त्यांनी भाजपवर पलटवार केला आहे.