रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील आरवली ते वाकेड या 90 किमीचे रखडलेले काम 15 जानेवारीपर्यंत सुरू न झाल्यास, शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडले आहे. विशेषतः संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड या 90 किलोमीटरच्या पट्ट्यात दहा टक्केही काम झालेले नाही. त्यामुळे चौपदरीकरणासाठी आणखी किती कालावधी लागणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान यावरूनच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा खा. विनायक राऊत यांनी दिला आहे.
खासदार राऊत म्हणाले की, 15 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची बैठक झाली. यावेळी गडकरी यांनीही ठेकेदाराला सुनावले होते. या बैठकीत हे काम 8 ते 10 दिवसांत सुरू करू, असा शब्द देण्यात आला होता. अजून जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत वाट पाहणार आणि त्यानंतर मात्र या रखडलेल्या कामासाठी शिवसेना प्रखर आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. नितीन गडकरी यांना विनंती करून आपण स्वतः त्या आंदोलनात उतरणार असल्याचे खा. राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.