रत्नागिरी - राजापूर नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं ही कारवाई करण्यात आली. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात येत असल्याचं आमदार राजन साळवी यांनी सांगितलं आहे.
- विरोधकांना पाठिंबा दिल्याने कारवाई - आमदार राजन साळवी
राजापूर नगरपरिषदेच्या सभेमध्ये नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा देण्याबाबत मंगळवारी झालेल्या सभेत ठराव मांडण्यात आला होता. त्याला सत्ताधारी पक्षाने पाठिंबा दिला. शिवसेना गट नेता विनय गुरव व नगरसेवकांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडत त्याला विरोध केला. परंतु, शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांनी पक्षाच्या विरोधात मतदान करून विरोधकांना पाठिंबा दिल्याने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
राजापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आँनलाईन होती. या आँनलाईन सभेला ठरावाच्या बाजूनी मतदान करताना शिवसेनेची दुसरी नगरसेविका आँनलाईन नव्हती. त्यामुळे सभेच्या ठरावावर ज्या वेळी या नगरसेविकेची सही होईल त्यावेळी या नगरसेविकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.