रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेतील १५ कुटुंबांसाठी धरणालगतच्या ज्या जागेवर निवारा शेड बांधण्यात येणार होते, त्या ठिकाणी सध्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे निवारा शेड बांधण्याचे काम रद्द करण्यात आले आहे.
प्रांताधिकारी कल्पना जगताप यांनी आज या जागेची पाहणी केली. या ठिकाणी ३ ते ४ इंचच्या रुंद भेगा आहेत, त्यामुळे ही जागा तात्पुरती किंवा कायमस्वरूपी निवारा शेडसाठी योग्य नाही. या सर्व घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ते स्वतः या ठिकाणी पाहणी करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी जगताप यांनी दिली.
शेड बांधण्यात येणाऱ्या जागेच्या तांत्रिक तपासणीसाठी भूगर्भतज्ञांकडे संपर्क साधण्यात आला आहे. तसेच जिल्हा खनिकर्म विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जगताप यांनी सांगितले.