रत्नागिरी- २३ एप्रिल रोजी खेडमधल्या लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थेच्या गोशाळेतील चारा डेपोला भीषण आग लागली. यात जवळपास 90 ट्रक चारा जळून खाक झाला. त्यामुळे सध्या लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थेच्या गो शाळेतील ७०० गायींवर उपासमारीची वेळ आली आहे.यामुळे चारा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन गोशाळेकडून करण्यात आले आहे.
चारा जळून गेल्याने सध्या या गुरांना चारा मिळणे अवघड झाले आहे. त्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या गोशाळेला दररोज किमान ३५ हजार रुपयांचा चारा लागतो. पण सध्या चाराच नसल्यामुळे चाऱ्याची मोठी अडचण या गोशाळेला भासत आहे.
चारा नसल्याने गुरांची उपासमार होत आहे. त्यामुळे सरकारने आणि दानशूर व्यक्तींनी या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे आवाहन गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे यांनी केले आहे. लॉकडाऊनचा फटका जसा माणसांना बसतोय तसाच तो मुक्या जनावरांना देखील बसत असल्याचे चित्र आहे.