रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं.
रत्नागिरी जिल्ह्यात या महिन्यात ब्रेक द चेन अंतर्गत सुरुवातीला 1 ते 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यांनतर 15 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं. मात्र जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय योग्य नसून सर्वाना विश्वासात घेऊन लॉकडाऊन जाहीर करण्यात यायला हवा होता, असं जिल्हा काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाच्या मनमानी आणि आडमुठे कारभाराचा निषेध करण्यासाठी आज सत्याग्रह आंदोलन करण्यात आल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात 72 कोटींची वीज बिल थकबाकी...
यावेळी लॉकडाऊनच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अशोक जाधव, हारिस शेकासन, दीपक राऊत, कपिल नागवेकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.