रत्नागिरी - मराठा रक्षणाचा तिढा सुटण्यासाठी लोकसभेत ठराव झाला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी व्यक्त केले आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विजयराव भोसले, भंडारी समाजाचे नेते नविनचंद्र बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
'लोकसभेत ठराव करा'
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापूरमध्ये केलेल्या मुक आंदोलनाला प्रदेश काॅग्रेस ओबीसी सेलने समर्थन दिले आहे. तसेच, काँग्रेस पक्षाचा आंदोलनाला विरोध नाही. मात्र, संभाजीराजे भाजपच्या कोट्यातून झालेले खासदार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत तुमचे खासदार आहेत. त्यामुळे तिथे आपण ठराव करावा, अशी विनंती प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने केली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्यासाठी लोकसभेने ठराव केला पाहिजे असेही भानुदास माळी म्हणाले.
'ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे'
दरम्यान, छगन भुजबळ यांचे ओबीसींचे आंदोलन हे त्यांच्या समता परिषदेच्या माध्यमातून होत आहे. हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात आहे. ओबीसींची जनगणना करा या मुद्यासाठी हे आंदोलन आहे. आमचीही हीच मागणी असल्याचे मत माळी यांनी यावेळी व्यक्त केले आहे.