रत्नागिरी - दिवाळी हा सण सगळीकडे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. अनेक जण स्वत:च्या हाताने कलाकृती तयार करत असतात. काही ठिकाणी दिवे, पणत्या साकारल्या जातात. तर अनेकजण आकाश कंदील बनवतात. अशाच प्रकारे चिवळुणमध्ये ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
ग्रीन कोव्ह परांजपे स्कीम या ठिकाणी प्रतापगडाची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या ठिकाणी लहान मुलांसहित तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. शिवरायांच्या इतिहासाची माहिती लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रतिकृती साकारल्याचे उपस्थितांनी सांगितले.
प्रत्येकाने आशा ऐतिहासिक गोष्टी उभारताना मुलांना मदत करावी व इतिहासाचे जतन करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले. कोकणात दरवर्षी गड-किल्ल्यांच्या प्रतिमा मोठ्या उत्साहाने साकारल्या जातात. या प्रतापगडाची प्रतिकृती तयार करण्यासाठी 15 ते 18 दिवसांचा कालावधी लागल्याचे मुलांनी सांगितले. हुबेहुब साकारलेल्या प्रतापगड पाहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.