रत्नागिरी - रत्नागिरीकरांच्या मागणीला अखेर यश आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यात आला आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपकेंद्राचे नामकरण केले जाणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. उदय सामंत यांनी रत्नागिरीकरांना दिलेला शब्द अखेर खरा करुन दाखविला आहे.
अनेक दिवसांपासूनची मागणी -
ज्येष्ठ चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव उपकेंद्राला देण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्ष रत्नागिरीतील साहित्य क्षेत्रासह सर्व पक्षिय नागरिक, भंडारी समाज यांच्याकडून होत होती. विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत याबाबत ठराव संमत करण्यात आला. उपकेंद्राचे नामकरण करतानाच त्याठिकाणी पद्मभूषण धनंजय कीर यांचे साहित्य अभ्यासासाठी ठेवले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
अभ्यासकांना डॉक्टरेट करण्याची संधी -
भविष्यात पद्मभूषण धनंजय कीर यांच्यावर डॉक्टरेट करण्याची संधी येथील अभ्यासकांना मिळणार आहे. तर पद्मभूषण धनंजय कीर यांचे जिल्ह्यासह साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे कार्य यामुळे जगभर पोहचण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - राज्यात 111 लाख टन साखर शिल्लक राहणार; कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता