रत्नागिरी - जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आपल्या देशासह राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्ण दररोज वाढत आहेत. पण कोरोना झालेल्या रुग्णांवर औषधोपचार करणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील देवरुख येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांनी अनोखी शक्कल वापरुन कोविड सेंटरमधील रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून उपचार करण्यासाठी मोबाईल अॅपद्वारे नियंत्रित रोबो कार्टची निर्मिती केली आहे.
जिल्ह्यातील देवरुखमधील आंबव येथे राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, आरोग्य विभागातले कर्मचाऱ्यांचा कोरोना रुग्णांशी कमीत कमी संपर्क कसा येईल? हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात घोळत होता. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केवळ दीड महिन्याच्या मेहनतीतून इथल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली एक उपकरण तयार केले. मोबाईल अॅपच्या माध्यमातून रोबो कार्टची निर्मिती केली. विशेष म्हणजे या कार्टच्या माध्यमातून थेट कोरोना रुग्ण कसा आहे? हे दिसण्यापासून ते या रुग्णांशी संवाद साधण्यापर्यंत सर्व गोष्टी आरोग्य विभागाचे कर्मचारी सोशल डिस्टसिंग राखत करू शकतात.
- रोबो कार्ट 50 किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतो.
- कार्टच्या माध्यातून ऑडिओ व्हिडिओ स्ट्रिमिंग
- कार्ट कोरोना वार्डमध्ये गेल्यास पुर्णतः निर्जंतुकीकरण करता येते.
- अॅल्युमिनियम कंपोझिट पॅनलचा वापर
- अत्यंत हलक्या वजनाचे
- 50 किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता
- पूर्णतः बॅटरीवर हा रोबो कार्ट चालतो.
या कार्टमध्ये अॅल्युमिनियमचा वापर केला आहे. मोबाईलमधल्या एका अॅपद्वारे हे कार्ट नियंत्रित केले जाते. या कार्टवरून मोबाईल जोडून थेट कोरोना वार्डमधील रुग्णांशी डॉक्टर संपर्क साधू शकतात. विशेष म्हणजे इंटरनेटच्या वापराशिवाय मोबाईल अॅपमधून ऑडिओ-व्हिडिओ स्ट्रिमिंगच्या माध्यमातून रुग्णांशी संवाद साधू शकतो. या रोबो कार्टसाठी २५ हजार रुपयांचा खर्च आला. हा रोबो कार्ट ब्ल्युटूथ टेक्नोलाजीद्वारे 30 मीटरपर्यंत नियंत्रित करता येऊ शकतो. डॉक्टर काही अंतरावरून रुग्णाला पाहून त्याच्याशी संवाद साधू शकतात. वापरानंतर कार्टचे सहजपणे निर्जंतुकीकरण करता येऊ शकते. या कार्टची उपयुक्तता पाहून माने अभियंत्रिकी महाविद्यालयाला रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनाने अशा दहा कार्ट बनवण्याची आर्डरही दिली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.