रत्नागिरी - रत्नागिरी तालुका शिवसेनेच्या वतीने पेट्रोल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा आणि शेतकरीविरोधी विधानासाठी रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला. खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयाजवळ हे निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी, केंद्र सरकार तसेच रावसाहेब दानवे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, शिवसेना तालुकाप्रमुख तथा रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, तुषार साळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - रावसाहेब दानवेंच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात 'पायताण मारो' आंदोलन
केंद्र सरकारचा निषेध
सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच सध्या शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एक धक्कादायक विधान केले होते. या आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे आंदोलन नाही, असे विधान दानवे यांनी केले होते. दानवे यांच्या या विधानाचा तसेच पेट्रोल दरवाढीचा आज जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. रत्नागिरीतही शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
जोरदार घोषणाबाजी
यावेळी निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. 'महागाईचा उडाला भडका, केंद्र सरकारला द्या तडका,' 'उठा उठा महागाई आली, सरकारची जाण्याची वेळ झाली,' 'भडकले भडकले पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले,' 'निघाले निघाले केंद्र सरकारचे दिवाळे निघाले,' 'पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध असो,' 'रावसाहेब दानवे यांचे करायचे काय? खाली डोकं वर पाय!,' 'देशात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले, रावसाहेब दानवे यांचे अकलेचे दिवाळे निघाले,' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा - 'शरद पवार दोन वेळा पंतप्रधान होताना राहिले, पण तो दिवस पुन्हा येईल'