रत्नागिरी - कोरोनामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आता अनलॉककडे जात असताना नागरिक मास्क वापरण्याबाबत दुर्लक्ष करत आहेत. काही ठिकाणी दंड देखील आकारला जात आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण तरीही अनेक जण विनामास्क फिरताना दिसतात. त्यांच्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून गांधीगिरी करत मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल न करता मास्कचे वाटप केले जात आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस आणि आरोग्य यंत्रणा करत आहेत.
राज्यात कोविड - १९ आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने कोरोनास प्रतिबंध व्हावा म्हणून सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाझर, मास्क इत्यादी बाबींचा अवलंब करावा याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाण, बाजारपेठेत नागरिक सोशल डिस्टन्सिंग अथवा मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तसेच खेडे गावातून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत मास्क वापरणे, ठराविक अंतर ठेवणेे, सॅनिटाझरचा वापर करणे याबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. मात्र जे नागरिक मास्क न वापरताना आढळले त्यांना दंड न करता सध्या पोलिसांकडून मास्कचे वाटप करुन प्रबोधन करण्यात येत आहे.