रत्नागिरी - उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने आपल्या परीक्षा संदर्भातील धोरण ठरवले आहे. तसा निर्णयही उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केला आहे. मात्र, सध्या कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील संभ्रमावस्था वाढली आहे. त्यामुळे कृषी व संलग्न अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी पत्राद्वारे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.
पत्राममध्ये आमदार शेखर निकम यांनी म्हटले आहे, की 'सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व कृषी व संलग्न महाविद्यालये सध्या बंद आहेत. या अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्रांत परीक्षा अद्याप होणे बाकी आहेत. लॉकडाऊनमुळे काही विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने परीक्षांना सामोरे जाण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यातच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षांबाबत धोरण ठरविले आहे व ते जाहीरही केले आहे. त्यामुळे कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील संभ्रमावस्था वाढली असून त्यांच्याकडून व त्यांच्या पालकांकडूनही विचारणा होत आहे.
विद्याथ्यांची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी कृषी व संलग्न अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत निर्णय लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण यात लक्ष घालून उच्च व तंत्रशिक्षण विभागाप्रमाणे लवकरात लवकर निर्णय करावा, अशी विनंती आमदार निकम यांनी पत्राद्वारे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.