रत्नागिरी - रत्नागिरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार)सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, चारही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
रत्नागिरी शहरातील १५ प्रभागांमध्ये एकूण ३० वॉर्ड असून यातील ४९ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यामध्ये एकूण ५८ हजार ७०० मतदार असून २८ हजार ७४६ पुरुष तर ३० हजार २३ स्त्री मतदार आणि इतर मतदारांची संख्या १ एक आहे. तर, इतर निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण ४०० कर्मचारी कार्यरत आहेत.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा; कार्यकारिणीमध्ये 16 उपाध्यक्षांची निवड
राहुल पंडीत हे २०१६ मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र, २ वर्षानंतर त्यांनी शिवसेनेअंतर्गत ठरल्यानुसार नगराध्यक्षपदाचा ५ महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून बंड्या साळवी काम पाहत आहेत. दरम्यान, या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे प्रदीप साळवी हे रिंगणात आहेत. शिवसेनेसमोर भाजपने कडवे आव्हान उभे केले आहे. भाजपने अॅड. दीपक पटवर्धन यांना निवडणूक रिंगणात उतरवून मतदारांसमोर उच्च विद्याविभुषीत, सुसंस्कृत, सामाजिक जाण असलेला उमेदवार उभा केला आहे.
महाआघाडीकडून माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांना उमेदवारी देवून सेना, भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही रुपेश सावंत यांना उमेदवारी देवून रंगत वाढवली आहे. आता या चौरंगी लढतीत विजयाचा कौल मतदार कोणाला देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा - रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्ष पोटनिवडणूक; ५८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क