रत्नागिरी- शहराच्या मुख्य बाजारपेठेतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हे प्रति पंढरपूर मानले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्थीचे पालन करून मंदिरात केवळ धार्मिक विधी पार पाडून कार्तिक एकादशी साजरा होणार आहे. या दिवशी भाविकांना पांडुरंगाचे केवळ मुखदर्शन घेता येणार आहे.
श्री विठ्ठल रखुमाई मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी कोणत्याही स्वरूपात यात्रा किंवा जत्रा भरवली जाणार नाही. त्याची जबाबदारी संस्थान घेणार नसल्याचा खुलासा रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिर संस्थेच्या अध्यक्षांनी लेखी पत्राद्वारे केला आहे. सरकारचे आदेश पाळून हा उत्सव साजरा करावा, अशी विनंतीदेखील संस्थानने भाविकांना केली आहे.
हेही वाचा-कार्तिकी एकादशी : तुकोबांचे मंदिरही या तीन दिवशी बंद राहणार
नियमांचे पालन करणे आवश्यक-
मुखदर्शनाला येणार्या भाविकांना मास्क, सॅनिटायझेशन व सुरक्षित अंतर असे नियम पाळावे लागणार आहेत. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन समितीने उत्सवाची चोख तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; चिमूरमधील श्रीहरी बालाजी मंदिर पुन्हा बंद!
आठ महिन्यानंतर मंदिरे झाली खुली-
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून राज्यभरात बंद असलेली मंदिरे तसेच धार्मिक स्थळे राज्य सरकारने 16 नोव्हेंबरपासून काही अटी व शर्ती आखून देत भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत. असे असले तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता आहे. कार्तिक एकादशीला राज्यातील बहुतांश मंदिरांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येणार आहे.