रत्नागिरी - राज्यभर कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काळाबाजार वाढला आहे. चढ्या दराने इंजेक्शनची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहेत.
आरोग्य राज्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. रेमडेसिवीरबाबत कारवाई करण्याचा सर्व ड्रग्ज इन्स्पेक्टरना सूचना दिल्या आहेत. प्रत्येक मेडिकल स्टोअरला जाऊन तेथील साठा किती आहे, किती इंजेक्शनची विक्री झाली, किती साठा येणार आहे, हे सर्व तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणी जास्त दराने इंजेक्शन विकताना आढळले, तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा डेथ रेट जास्त आहे. येत्या 8 ते 15 दिवसांत यात सुधारणा होईल, असे आश्वासन आरोग्य विभाग व प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.