रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील ओणी-कोंडीवळे या गावातील नागरिकांनी तब्बल 3 टन धान्य मुंबईमध्ये असलेल्या आपल्या गावातील नागरिकांसाठी रवाना केले. तसेच धान्य प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.
''आपण गावात सुरक्षित आहोत. मात्र, मुंबई ठप्प असल्याने तिथला चाकरमनी अडचणीत असल्याने संपूर्ण गावाने धान्य पाठविण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे, ''ग्रामस्थ वसंत जड्यार यांनी सांगितले. प्रत्येक घरातून पाच किलो याप्रमाणे गावातून ३ टन धान्य जमा करण्यात आलं.
मुंबई ठप्प असल्याने अनेक चाकरमान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, गावकऱ्यांनी तांदूळ आणि डाळींचे एकूण ५०० पॅकेट्स नालासोपारा, विरार, बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रूझ, कांदिवली आणि दादर परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांपर्यत पोहचविले आहेत. स्थानिक आमदार राजन साळवी यांनी ही मदत मुंबईपर्यत पोहोचविण्यासाठी विविध परवानग्या मिळवून दिल्या.
गावाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला चाकरमान्यांसाठी संपूर्ण गाव धावून आल्याच्या, या हृद्ययस्पर्शी उपक्रमाचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे.