रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, राजापूर बाजारपेठेत गर्दी काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. यावेळी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे राजापूर पोलीस आणि नगरपरिषदेमार्फत विनापरवाना भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
राज्यात कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ हजारांच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहे. लॉकडाऊन वाढवल्यानंतरही नागरिक निष्काळजीपणे घराबाहेर पडत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या नावावर विनाकारण रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यामुळे राजापूर पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेने कडक पावले उचलले आहेत. विनापरवाना भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शिवायस विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांवर देखील कारवाई केली जात आहे. यामध्ये अनेक दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत.