रत्नागिरी - जिल्ह्यात आज (सोमवारी) सकाळपासूनच अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही.
शहरासह ग्रामीण भागातही पावसाची रिपरिप -
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्याच्या काही भागात गेल्या 2 ते 3 दिवसांत पावसाने हजेरी लावली. त्यातच आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या आहेत. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातही पावसाची रिपरिप सुरू आहे.
हेही वाचा - मुंबईत मध्यरात्रीपासून संततधार; पुढील २४ तासात ठाणे-रायगडमध्येही पावसाचा इशारा..
आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत -
अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. आंब्याला मोहर धरू लागला होता, त्यातच ढगाळ वातावरण तसेच या पावसामुळे या मोहरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यास बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंब्यावर केलेली फवारणीसुद्धा वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.