रत्नागिरी - जिल्ह्यात आज चिपळूण वगळता इतर ठिकाणी तुरळक सरी बरसत आहे. आज (शुक्रवारी) चिपळूणमध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
पावसाचा जोर ओसरला
गेल्या चार दिवसात जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे, मात्र आज चिपळूण वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी पावसाचा जोर थोडा ओसरल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी बरसत असून, अधूनमधून पावसाची एक मोठी सर येत होती. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 43.33 पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, खेड, संगमेश्वर आणि लांजा वगळता इतर सर्व ठिकाणी 50 मि.मी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
दुथडी भरून वाहत आहेत नद्या
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात पडला असून, 77.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मंडणगडमध्ये 75.80 मिमी, संगमेश्वरमध्ये 55.90 मिमी आणि लांजा तालुक्यात 54.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांनी इशारा पातळी ओलांडली नसली, तरी सध्या जिल्ह्यातील नद्या अक्षरश:दुथडी भरून वाहत आहेत. सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असून सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, मात्र जर पाऊस वाढला तर नद्या इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - शिवसेनेचा 55वा वर्धापन सोहळा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ऑनलाइनच्या माध्यमातून संबोधन